विदर्भस्तरीय आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेला अमरावतीत शानदार प्रारंभ
अमरावती : विदर्भ क्रिकेट असोसिएशन, नागपूर, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती आणि अमरावती एमेच्युअर क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विदर्भस्तरीय आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या चक्र ग्राउंडवर मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. प्रशांत देशपांडे होते, जे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि अमरावती जिल्हा हौशी क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव आणि डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या उपप्राचार्या डॉ. माधुरीताई चेंडके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे, तसेच अमरावती जिल्हा हौशी क्रिकेट संघटनेचे सचिव प्रा. डॉ. दिनानाथ नवाथे, आणि मंडळाचे सदस्य प्रा. सतीश भागवत यांची उपस्थिती लाभली.
स्पर्धेचे आयोजन विदर्भातील क्रिकेटप्रेमींना एक व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने करण्यात आले असून, यात विविध जिल्ह्यांतील नामवंत संघ सहभागी झाले आहेत. खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असून स्पर्धेचे सामने पुढील काही दिवस चक्र ग्राउंडवर रंगतील.