LIVE STREAM

AmravatiLatest News

सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार – विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे

अमरावती : विधान परिषदेचे सभापती पद हे संविधानिक पद आहे. या पदाला समन्वय साधण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे या समन्वयातूनच येत्या काळात सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.

आज छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात श्री. शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, आमदार किरण सरनाईक, संजय खोडके, सुलभा खोडके, रवी राणा, प्रताप अडसड, राजेश वानखेडे, प्रवीण तायडे, उमेश यावलकर, गजानन लवटे, प्रवीण पोटे, ॲड. दिलीप एडतकर आदी उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, सभापतीपदाने जनतेची कामे करण्यासाठी जबाबदारी दिली आहे. हा विश्वास आणखी काम करण्यासाठी ऊर्जा देणारा आहे. येत्या काळात सकारात्मकपणे कामे करण्यात येतील. प्रामुख्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त विविध कामे हाती घेण्यात येतील. अहिल्यादेवींनी केलेल्या मंदिराचा जिर्णोद्धार आणि धर्म जागविण्याचे कार्य ही यामागील संकल्पना आहे. अहिल्यादेवींनी काशी विश्वेश्वर, केदारनाथ मंदिराचा जिर्णोद्धार आणि असंख्य धर्मशाळा, अन्नछत्र आणि घाट बांधले आहे. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव म्हणून अहिल्यानगर नामकरण आणि सोलापूर विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. धनगर समाजाच्या असलेल्या न्याय्य मागण्यासाठी कायम पाठिंबा राहील. तसेच दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.
पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी श्री. शिंदे यांच्या रूपाने युवा नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या माध्यमातून समाजाच्या कल्याणासाठी विविध विकास कार्य करण्यात येतील. विधिमंडळातही सदस्य आणि शासनाचा समन्वय साधून त्यांनी आपल्या कार्याची छाप उमटवली आहे. सभागृहाचे कामकाज सुरू असताना ते पूर्ण झाल्याशिवाय सभागृह सोडत नाहीत. समाजात कार्य करत असताना आई-वडील, माती आणि समाजाचे ऋण चुकविणे गरजेचे आहे. हाच वसा श्री. शिंदे जपून कार्य करीत आहे. तसेच समाजातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी विधिमंडळात कायदा होणे गरजेचे आहे. यासाठी श्री. शिंदे यांची सभापती म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले.
श्री. एडतकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, किरण सरनाईक, सुलभा खोडके, रवी राणा यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम येथील मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
00000

Show More

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!