2100 रुपये देऊ असं म्हटलं नव्हतं, 1500 मध्येही लाडक्या बहिणी खूष, महायुतीतील नेत्याचं विधान

विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना आणण्यात आली. याअंतर्गत महिलांच्या खात्यात 1500 रुपये देण्यात येतात. दरम्यान सरकार पुन्हा सत्तेत आल्यास ही रक्कम 2100 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले. हे आश्वासन पूर्ण न झाल्याने आधीच महिलांमध्ये नाराजी आहे. त्यात इतर सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींनी 1500 रुपयांऐवजी 500 रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात आले. यानंतर लाडक्या बहिणींनी डोक्यावर हात मारुन घेतला. दरम्यान आता महायुतीतील एका नेत्याने लाडक्या बहिणी 1500 रुपयांमध्ये खूष असल्याचं विधान केलंय.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे महाराष्ट्र गौरव मंगल कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली असून उत्तर महाराष्ट्रातून मुक्ताईनगर तालुक्यातून आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन घेत सुरू होणार आहे. यावेळी अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन घेत यात्रेला सुरुवात केली. या यात्रेत माजी मंत्री अनिल पाटील यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नरहरी झिरवळ यांनी लाडकी बहिण योजनेसंदर्भात विधान केले.
माझं भाग्य आहे की, आज मला आदिशक्ती मुक्ताई चे दर्शन घ्यायची संधी मिळाली. महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी ज्यांचा समावेश आहे त्यांच्या खुणा, माती, जल हे रथ यात्रेचे माध्यमातून उत्तर महाराष्ट्राची मुक्ताईनगर येथून सुरवात झाल्याची माहिती नरहरी झिरवळांनी दिली. संपूर्ण राज्यभर हा कार्यक्रम राबवला जातोय. सर्व राज्यातील माती, जल महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळी अर्पण केले जाणार असल्याचे नरहरी झिरवाळ म्हणले. महाराष्ट्र ज्या विकासाच्या गतीने चाललाय त्याच गतीने पुढे अग्रेसर राहो, असे साकडे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आदिशक्ती मुक्ताईला यावेळी घातले.
‘लाडक्या बहिणी खूष’
लाडक्या बहिणी नाराज असल्याचे आपण किंवा विरोधक सांगतात. पण सर्व लाडक्या बहिणीला खुश आहेत. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कोणीही म्हटलेलं नाही, असं विधान मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलंय. हे पंधराशे रुपयेदेखील देणार नाहीत यांची देण्याची ऐपत नाही असा प्रचार विरोधकांनी सुरू केला होता. मात्र 1500 रुपये दिल्यानंतर विरोधकांनी आता 2100 रुपयावर जास्त जोर धरला आहे. मला वाटतं पंधराशे रुपये ही रक्कमदेखील परिपूर्ण आहे. महिला पंधराशे रुपये मिळाल्यानंतरही खुश आहेत, असे झिरवळ म्हणाले.
मंत्रिमंडळ नवीन चेहरे
मंत्रिमंडळात नवीन लोकांना संधी देणे हे अजित दादांचे चांगले धोरण आहे. माजी मंत्री अनिल पाटील माजी मंत्री छगन भुजबळ यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागावी अशी आमची विनंती असल्याचे ते म्हणाले.