अकोला जिल्ह्यात कुरणखेड चंडिका देवी मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरी

अकोला : जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कुरणखेड तिर्थक्षेत्रातील चंडिका देवी मंदिरात चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी लंपास केली, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास तीन चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यांनी मंदिरातील दोन दानपेट्या उचलून बाजूच्या सभागृहात नेल्या आणि त्यातील रक्कम चोरून नेली.
दरम्यान, दोन दानपेट्यांतील नेमकी किती रक्कम चोरीला गेली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे, कारण चोरट्यांनी आता देवस्थानेही लक्ष करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे.