AmravatiLatest News
सेवा हमी हक्काची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी सौरभ कटियार
अमरावती : सेवा हमी हक्क अधिनियमाला दहा वर्षे पुर्ण झाली आहे. यात शासनाने विविध सेवा अधिसूचित केल्या आहे. सेवा प्रदान करण्यासाठी मुदत निश्चित केली आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सेवा मुदतीत प्रदान करून सेवा हमी हक्क अधिनियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन भवनात सेवा हमी हक्क दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, अधिक्षक निलेश खटके, सेवा हक्क हमी आयुक्त कार्यालयाचे कक्ष अधिकारी डॉ. देवेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015च्या अंमलबजावणीस दहा वर्षे पूर्ण झाली आहे. त्यानिमित्ताने सेवा हक्कम दिन साजरा करण्यात येत आहे. दशकपूर्तीनिमित्त जिल्हा आणि ग्रामपातळीवर विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. कमी कालावधीत अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे. नागरिकांना आवश्यक असलेल्या सुविधा ऑनलाईन मिळत आहे. सध्या 486 सेवा अधिसूचित केल्या आहेत. ॲप, वेबसाईट, आपले सरकार सेवा केंद्र आदींच्या माध्यमातून सेवांसाठी अर्ज करणे शक्य झाले आहे. नागरिकांची सोय होण्यासोबतच माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आल्यामुळे प्रशासनाची सुविधा झाली असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थितांनी सेवा देण्यासंदर्भात शपथ घेतली. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या वतीने जन्मदाखल्याचे वितरण करण्यात आले. तसेच विविध विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.