इराणहून झारखंडला पाठवला चुकीचा मृतदेह; एक महिना वाट पाहणाऱ्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर

झारखंडच्या पश्चिम सिंहभूम येथील मनोहरपूर येथे वयस्कर आई-वडील आपला मुलगा अह्लाद नंदन महतोच्या मृतदेहाची वाट पाहत होते. इराणमधून भारतात मृतदेह पोहोचण्यासाठी तब्बल एक महिना लागला. पण जेव्हा मृतदेह घरी पोहोचला आणि शवपेटी उघडून पाहिली तेव्हा कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण शवपेटीत ठेवण्यात आलेला मृतदेह दुसऱ्याच व्यक्तीचा होता.
झारखंडच्या मनोहरपूर येथे पोहोचलेला मृतदेह उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधील शिवेंद्र प्रताप सिंहचा होता. एक महिना वाट पाहिल्यानंतर आणि सगळ्या अवघड सरकारी प्रक्रिया पार पाडल्यानंतरही जर मृतदेहाची अदबाबदल होत असेल तर ही चूक नव्हे तर अमानवीय क्रूरता असल्याचा संताप कुटुंबाने व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोहरपूर ब्लॉकमधील तारतारा गावातील अह्लाद नंदन महातो गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नोकरीसाठी इराणला गेला होता. २८ मार्च रोजी त्याच्या कुटुंबाला जहाज अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचं कळवण्यात आलं. यानंतर घरात शोककळा पसरली आणि मृतदेह आणण्यासाठी संघर्ष सुरू झाला. कुटुंबाने भारतीय दूतावासाला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे दिली. कुटुंबाने प्रत्येक दरवाजा ठोठावला. पण जेव्हा मृतदेह पोहोचला तेव्हा तो मनोहरपूर येथील आहलादचा नसून उत्तर प्रदेशातील शिवेंद्र प्रताप सिंहचा असल्याचं उघड झालं.
अह्लाद नंदन महातोचा भाऊ रघुनंदन महातो याने सांगितलं की, “त्यांना कोलकाता विमानतळावर मृतदेह पाहण्याची परवानगीही देण्यात आली नाही. त्यांना एक सीलबंद शवपेटी देण्यात आली आणि स्वाक्षरी घेण्यात आली. विमानतळ प्राधिकरण आणि दूतावासाचे काम फक्त कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापुरते मर्यादित आहे का? मृतदेहाची ओळख पटवणे, कुटुंबाचे समाधान, या गोष्टी प्राधान्याबाहेर आहेत का?”.
शिवेंद्रच्या कुटुंबाकडे सोपवला जाणार मृतदेह
आता मनोहरपूरला पोहोचलेला हा मृतदेह चक्रधरपूर रेल्वे रुग्णालयाच्या शीतगृहात ठेवण्यात आला आहे. मृतदेह आता मृत शिवेंद्रच्या कुटुंबीयांना सोपवण्यात येईल. पण इराण जहाज अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अह्लाद नंदन महातोचा मृतदेह कुठे आहे? हा प्रश्न अनुत्तरित आहे.