अकोला बसस्थानकात सोनं चोरणारी महिला चोर गजाआड

अकोला : अकोला शहरातील नवीन बस स्थानक परिसरात प्रवासी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून धूम ठोकणारी एक सराईत महिला सिव्हिल लाईन पोलिसांच्या जाळ्यात अखेर अडकली आहे. अकोला ते पातूर या बसमार्गावर प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील साडे तीन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे सिव्हिल लाईन पोलिसांच्या विशेष पथकाने संशयित महिला आरोपी कीर्ती रोहित गायकवाड हिला शिताफीने अटक केली. पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर, आरोपीने आश्चर्यकारकपणे एकूण 10 चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली, ज्यामुळे पोलिसही काही वेळ गोंधळले होते.
पोलिसांनी आरोपीकडून एकूण 80 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले असून, त्यांची अंदाजे किंमत ₹3,09,138 असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर आरोपी ही विविध भागांतील बसस्थानकांवर महिलांना लक्ष्य करून सोन्याचे दागिने लंपास करत होती.
पोलिसांकडून तिच्या विरोधात आरोपपत्र तयार करण्यात येत असून, तपास सुरू आहे. शहरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने, पोलिसांची विशेष दक्षता ठेवण्यात येत आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, आरोपी महिला ही पूर्वीही अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सामील होती. अकोला पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवावे आणि संशयास्पद व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी.