LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

जपानी कंपन्यांना भारतात सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मोठी संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारत लहान अणुऊर्जा प्रकल्प आणण्याचा विचार करत आहे. जपानी कंपन्यांना यात मोठ्या संधी आहेत. भारत सरकार अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणूक सुरू करण्यासाठी कायद्यात बदल करत आहे. थोरियम इंधनाच्या वापराबद्दलही संशोधन सुरू आहे. सौर पॅनेल आणि टर्बाइन ब्लेड रीसायकलिंग मध्येही जपानकडे उत्तम तंत्रज्ञान आहे. जपानी कंपन्यांना भारतात सौर क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हॉटेल फोर सीजन येथे भारत-जपान पार्लियामेंट्री फ्रेंडशिप लीगचे अध्यक्ष आणि जपानचे अर्थ, उद्योग, व्यापार मंत्री निशिमुरा यासुतोशी यांच्यासमवेत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी राज्यसभा खासदार मिलिंद देवरा, उद्योग विभागाचे सचिव डॉ.अन्बळगन पी. मुख्यमंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते. बैठकीत पहलगाम येथील हल्यात ज्यांना आपले प्राण गमावावे लागले त्यांच्याप्रती दुःख व्यक्त करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जपान सरकार आणि जायकाच्या सहकार्यामुळे मेट्रो, अटल सेतू यांसारख्या सर्व मोठ्या प्रकल्पांची उभारणी झाली आहे. भारतीयांच्या मनात जपानी व्यवसाय, उत्पादने, कंपन्या आणि लोकांबद्दल मोठा विश्वास आहे.

पुणे येथे जपानी उद्योगांसाठी एक औद्योगिक पार्क सुरू केला आहे. तिथे जास्तीत जास्त जपानी कंपन्या याव्यात, अशी इच्छा आहे. सुमितोमो आणि ताइसेई या दोन्ही कंपन्यानी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. जपानचे शिपिंग क्षेत्रात सुद्धा मोठं सहकार्य आहे. भारतात डेटा सेंटर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. महाराष्ट्र आज देशाचा डेटा सेंटर कॅपिटल झाला आहे. भारतातील ६५ टक्के डेटा सेंटर महाराष्ट्रात असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

स्टार्टअप्समध्येही आम्ही एकत्र काम करण्यास इच्छुक असल्याचे सागून मंत्री निशिमुरा यासुतोशी यांनी लवकरच जपानमध्ये एक सेमिनार आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. या सेमिनारसाठी उपस्थित राहण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्री श्री. यासुतोशी यांनी विनंती केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ‘वेव्हज २०२५’ बद्दल मंत्री श्री. यासुतोशी यांना माहिती दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!