अमरावती शहरात अनधिकृत बॅनरांचा सुळसुळाट!

अमरावती : अमरावती शहरात मनपाने जाहिरात होल्डिंग लावण्यासाठी ८० ठिकाणी तात्पुरती परवानगी दिली असली, तरी वास्तव काहीसं वेगळंच आहे. शहराच्या विविध झोनमध्ये QR कोडद्वारे परवानगी घेऊनच होल्डिंग लावायचं नियम असूनसुद्धा, मनपा कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरही अनधिकृत बॅनर खुलेआम लावले जात आहेत.
सध्या अमरावती व बडनेरा शहरांमध्ये केवळ ३ दिवसांसाठीच बॅनर लावण्याची परवानगी आहे. मात्र अनेक बॅनर आठवड्यांनंतरही तसचे लटकलेले दिसतात. ना त्यांच्यावर कारवाई, ना कोणती चौकशी. यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी आहे.
राजकीय कार्यक्रम, वाढदिवसांचे शुभेच्छा फलक आणि व्यावसायिक जाहिराती – हे सर्व बिनधास्तपणे शहरभर झळकत आहेत. यामुळे सार्वजनिक सौंदर्य धुळीला मिळालं असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी सांगितलं होतं की, अशा अनधिकृत बॅनरमुळे शहर स्वच्छतेवर परिणाम होतो. पण अमरावती महापालिकेकडून कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही.
प्रश्न असा आहे की, जर सामान्य नागरिक विनापरवानगी बॅनर लावतो, तर त्याच्यावर कारवाई होते; मग राजकीय पक्षांच्या बॅनरविरोधात मनपा गप्प का?
मनपा प्रशासन अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर खरंच फौजदारी कारवाई करणार का, की हे नियम पुन्हा हवेत विरणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.