पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ उमरखेड शहर कडकडीत बंद

उमरखेड : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध उमरखेड शहराने एकत्रितपणे केला. उमरखेडमध्ये शहरातील सर्व व्यापारी, सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय राजकीय प्रतिनिधींनी एकत्र येत कडकडीत बंद पाळला. हल्ल्यात निर्दोष पर्यटकांवर झालेल्या अमानवी कृत्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
या बंददरम्यान शहरातील सर्व दुकाने, आस्थापना आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती. यावेळी शहरातून जोरदार निषेध मोर्चा काढण्यात आला. पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करत, दहशतवादाचा निषेध नोंदविण्यात आला. मोर्चादरम्यान पाकिस्तानचा पुतळा आणि तिरडी जाळून संताप व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात सर्वपक्षीय नेते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. दहशतवाद्यांच्या अमानुष कृत्यांविरुद्ध उमरखेडकर एकवटल्याचे चित्र या आंदोलनातून दिसून आले.
“देशविरोधी कारवायांना यापुढे खपवून घेतलं जाणार नाही”, असा निर्धार यावेळी सहभागी नागरिकांनी व्यक्त केला