गुरुकुंजात राष्ट्रसंतांच्या महासमाधिस अभिवादन करून मंगल कलश यात्रेचा शुभारंभ

गुरुकुंज : मुंबईत होणाऱ्या ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्यातर्फे मंगल कलश यात्रेचा शुभारंभ आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज आश्रमातून करण्यात आला.
१ ते ४ मे २०२५ दरम्यान मुंबईत आयोजित होणाऱ्या ६५व्या महाराष्ट्र दिन विशेष महोत्सवासाठी ही राज्यव्यापी यात्रा काढण्यात येत आहे. आज सकाळी १० वाजता राष्ट्रसंतांच्या महासमाधीला अभिवादन करून मंगल कलश यात्रेची भव्य सुरुवात करण्यात आली.
टाळ-मृदंगाच्या गजरात यात्रेचं स्वागत
गुरुकुंज आश्रम ते विश्वमानव मंदिर दासटेकडीच्या प्रवेशद्वारापर्यंत टाळ, मृदंग आणि भगव्या पताका लहरवत शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेचे स्वागत अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तिवसा तालुका यांच्या वतीने करण्यात आले.
राजकीय आणि सामाजिक नेतृत्व एकत्र
यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी ना. इंद्रजित नाईक, आ. अमोल मिटकरी, आ. सुलभा खोडके, आ. संजय खोडके, क्रांती धोटे, वसंत घुईखेडकर, सुरेखा ठाकरे, संतोष महात्मे, मंदा देशमुख यांच्यासह, अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळाचे पदाधिकारी – लक्ष्मण गमे, पौर्णिमा सवाई, डॉ. राजाराम बोथे, व तिवसा तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
अमोल मिटकरी यांचं भजन सादरीकरण ठरलं विशेष आकर्षण
कार्यक्रमात आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भजने सादर केली. त्यांचे सादरीकरण उपस्थितांमध्ये भावनिक लहर निर्माण करणारे ठरले.
सुरक्षा बंदोबस्त आणि भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुरुकुंज आश्रम परिसरात तिवसा पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळपासूनच समाधीस्थळ परिसरात भक्तांचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा जमाव दिसून आला.