LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

उदंचन जलविद्युत प्रकल्पांतील वीज निर्मितीतून राज्य ऊर्जा संपन्न बनवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्य ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पांमधून ऊर्जा निर्मितीसाठी शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. हरित ऊर्जा निर्मितीसह राज्याला ऊर्जा संपन्न बनविण्यासाठी उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर राज्य शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. जलसंपदा विभाग, महाजेनको, महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड आणि अवादा अ‍ॅक्वा बॅटरीज प्रा. लि. या कंपन्यांमध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र ऊर्जा निर्मितीत अधिक सक्षम होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या पुढील काळात ऊर्जा क्षेत्रातील कामे विहित कालमर्यादेत संबंधित यंत्रणांनी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात जलसंपदा विभागसोबत नऊ साईटसाठी तीन सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा ( विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री म्हणाले, उदंचन जलविद्युत प्रकल्प हे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण व अद्ययावत तंत्रज्ञान आहे. या जलविद्युत प्रकल्पांव्दारे शेती, उद्योग व व्यावसायिक क्षेत्रासाठी विजेची वाढती मागणी पूर्ण करण्याबरोबरच शाश्वत आणि हरित उर्जा निर्मिती होणार असल्याने पर्यावरणाचेही रक्षण होईल. राज्याच्या एकूण ऊर्जा निर्मिती क्षमतेच्या ५० टक्के क्षमता अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करण्याच्या शासनाचा मानस असून त्यादृष्टीने नियोजन व काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

आज झालेल्या सामंजस्य करारामुळे उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून ५७ हजार २६० कोटी इतकी गुंतवणूक होणार आहे. याअंतर्गत राज्यात ८ हजार ९०५ मेगावॅट क्षमतेचे उदंचन प्रकल्प उभारले जाणार आहेत. या प्रकल्पातून ९ हजार २०० इतकी रोजगार निर्मिती होणार आहे.

जलसंपदा विभाग आणि महाजेनको यांच्यासोबतच्या उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी ३१४५ मेगावॅट क्षमतेच्या, महाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड यांच्यामार्फत २११० मेगावॅट क्षमतेच्या तर अवादा अ‍ॅक्वा बॅटरिज यांच्यासोबतच्या ३६५० मेगावॅट क्षमतेच्या करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

महाजेनको मार्फत घाटघर येथे १२५ मेगावॅट, कोडाळी येथे २२० मेगावॅट, वरसगाव येथे १२०० मेगावॉट आणि पानशेत येथे १६०० मेगावॅटचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड यांच्यामार्फत मुतखेड येथे ११० मेगावॅट, निवे येथे १२०० मेगावॅट आणि येथे वरंढघाट येथे ८०० मेगावॅटचे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तर अवादा अ‍ॅक्वा बॅटरीज लि. यांच्यामार्फत पवना फल्याण येथे २४०० मेगावॅट आणि सिरसाळा येथे १२५० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

या सामंजस्य करारप्रसंगी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी., जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, महानिर्मितीचे संचालक संजय मारुडकर आणि अभय हरणे, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!