पहलगाम दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावलेलं नांदेडचं लोलगे दांपत्य

नांदेड – २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. मात्र काही पर्यटक थोडक्यात बचावले, त्यात नांदेड येथील कृष्णा लोलगे आणि साक्षी लोलगे या दांपत्याचा समावेश आहे.
लोलगे दांपत्य सहलीसाठी पहलगाम येथे गेले होते. हल्ल्याच्या वेळी ते घटनास्थळापासून केवळ काही अंतरावर होते. आज नांदेडला परतल्यानंतर त्यांनी घटनेचा थरारक अनुभव माध्यमांसमोर मांडला.
“मृत्यू अगदी जवळून गेला…”
कृष्णा लोलगे यांनी सांगितले की, “आम्ही फक्त काही मिनिटांनी त्या जागेपासून निघालो होतो. अचानक आवाज झाला, आणि काही क्षणातच समजलं की गोळीबार सुरू झाला आहे. मृत्यू अगदी एक पाऊल दूर होता.” त्यांची पत्नी साक्षी लोलगे यांनीदेखील या घटनेमुळे आपण अजूनही धक्क्यात असल्याचे सांगितले.
घटनास्थळाजवळ होते लोलगे दांपत्य
हल्ल्याच्या वेळी पहलगामच्या बाजारपेठेत काही वेळ थांबून लोलगे दांपत्य पुढे निघाले होते. हल्ल्यानंतर काही क्षणांतच सगळीकडे गोंधळ उडाला होता. स्थानिक सुरक्षादलांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली.