अकोल्यात बालविवाहाच्या विरोधात धर्मगुरूंची शपथसभा; अक्षय तृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी विशेष मोहिम

अकोला : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय आणि ॲसेस टू जस्टीस प्रकल्प I.S.W.S. अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाहाच्या विरोधात धर्मगुरूंची विशेष सभा जिल्हा न्यायालयाच्या परिसरातील विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात पार पडली.
अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात बालविवाह होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी धर्मगुरूंची भूमिका महत्वाची असल्याने या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेमध्ये उपस्थित सर्व धर्मगुरूंनी “बालविवाह मुक्त भारत आणि अकोला जिल्हा” करण्याची शपथ घेतली. त्यांनी असेही स्पष्ट केले की, बालविवाहाचे आयोजन करणार नाहीत तसेच त्याला पाठिंबा देणार नाहीत.
2030 पर्यंत भारतात बालविवाहाचे प्रमाण 5% पेक्षा कमी करण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. याच उद्देशाने अकोला जिल्ह्यात जनजागृती वाढवण्यावर भर दिला जात आहे.
सभेत धर्मगुरूंनी आश्वासन दिले की, प्रत्येक प्रार्थनास्थळी बालविवाह मुक्त अकोला जिल्हा ही मोहीम पोहोचवली जाईल. तसेच, सर्व धर्मीय समाजात माहिती पत्रके वाटून, जनजागृती केली जाईल.
या उपक्रमामुळे अकोला जिल्ह्यात बालविवाह रोखण्यास मदत होणार असून, एक सामाजिक परिवर्तन घडवण्याच्या दिशेने ही मोठी पावले उचलली जात आहेत.