मुलाने केली पित्याची हत्या अक्षय तृतीयेच्या दिवशी खळबळजनक घटना उघड

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लोणी गुरव या गावात अक्षय तृतीयेसारख्या पवित्र दिवशी एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरख हिवराळे या ५० वर्षीय पुरुषाचा मृतदेह त्याच्या घरात अंथरुणावर आढळून आला असून, प्राथमिक चौकशीत त्याच्या मुलानेच त्याची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मृत गोरख हिवराळेला दारूचे अतिव्यसन होते आणि तो आपल्या पत्नीवर नेहमीच अत्याचार करायचा. या अत्याचारामुळे मुलगा धनंजय हिवराळे दीर्घकाळ तणावाखाली होता. अखेर संतापाच्या भरात, मंगळवारी रात्री झोपेत असलेल्या वडिलांवर लाकडी दांड्याने वार करत त्याने त्यांचा जीव घेतला.
घटनेची माहिती सकाळी गावकऱ्यांना मिळाल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपास सुरू आहे. आरोपी मुलगा धनंजय हिवराळेला अटक करण्यात आली आहे.
सध्या लोणी गुरव गावात या घटनेमुळे तणावाचे वातावरण असून, नागरिकांमध्ये संताप आणि शोक मिश्रित भावना निर्माण झाल्या आहेत. पोलीस अधिक तपास करत असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.