अचलपूर तालुक्यात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस उत्साहात साजरा

अचलपूर : अचलपूर तालुक्यात 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी अचलपूर उपविभागीय कार्यालयात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. उपविभागीय अधिकारी बळवंत रखराव यांनी ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी दिली. या वेळी “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीताच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांनी देशभक्तीची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमावेळी प्रभारी तहसीलदार मनवे, नवीन तहसीलदार अक्षय मांडवे, परतवाड्याचे ठाणेदार सुरेश मस्की, तसेच अचलपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार मेहेत्रे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
त्याचप्रमाणे अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील उत्साहाचे वातावरण होते. येथे सभापती सौ. प्रतिभा प्रशांत ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संपूर्ण संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, आणि अचलपूर नगरपरिषद येथेही ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. सर्वत्र देशप्रेम, एकता व अभिमान व्यक्त करणारा जल्लोष दिसून आला.