‘राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ’, पंतप्रधान मोदींनी मराठीत दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

आज 1 मे आजच्या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे. 1 मे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली होती. या निमित्ताने आज राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. आजच्या महाराष्ट्र दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडिया एक्सवर (पुर्वीचे ट्विटर) पोस्ट शेअर करत महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठीमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका महाराष्ट्र बजावत आहे. तसेच राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलं?
“भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याच वेळी आपल्या मूळाशीही घट्ट जोडलेले आहे. राज्याच्या प्रगतीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री काय म्हणालेत?
महाराष्ट्रातील तमाम बंधू-भगिनींना आणि देशातील आणि जगभरातील मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. महाराष्ट्र दिन हा यासाठी महत्वाचा आहे की भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा हा महाराष्ट्र निरंतर भारताच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका पार पाडत आहे. याचा सर्वांना अभिमान आहे. या महाराष्ट्राला असंच पुढे घेऊन जायचं आहे हा आमचा संकल्प आहे. सर्वांना बरोबर घेऊन विकसित महाराष्ट्र घडवायचा आहे, असा आमचा निर्धार आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.