महाराष्ट्र दिन हा दिवस मराठी अस्मितेचा, शौर्याचा आणि एकतेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो – आ. सुलभाताई खोडके
अमरावती :- भाषावार प्रांतरचना भारतीय राजकीय व्यवस्थेचा महत्वपूर्ण टप्पा आहे. ज्या प्रदेशात एकाच भाषेचे बहुसंख्य लोक राहतात, ज्यांचे दैनंदिन लोकजीवन व संस्कृती एकाच भाषेशी निगडित असते तो प्रदेश राज्य कारभाराच्या दृष्टीने एकसंघ व वेगळा असला पाहिजे ह्या उद्देशाने दिनांक 1 मे 1960 रोजी मराठी महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली. अर्थात संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अनेक राजकीय आंदोलने झाली या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जवळपास 105 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे ही गोष्ट विसरून चालणार नाही.
मराठी ही या प्रदेशाची अस्मिता आहे. महाराष्ट्राचे वैभव म्हणजे येथील संत संस्कृती आणि आदर्श राज व्यवस्था होय.आज 1 मे या दिवशी महाराष्ट्राने 65 वर्षे पूर्ण केली आहेत. महाराष्ट्र एक स्वतःची अशी ओळख घेऊन उभा आहे आणि प्रगतीसह त्याची वाटचाल अखंडपणे चालू आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आल्यापासून चहू दिशांनी विशिष्ट वैचारिक – सामाजिक भूमिका घेत होत गेलेला राज्याचा विकास देशाने पाहिला आहे.दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. हा दिवस मराठी अस्मितेचा, शौर्याचा आणि एकतेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.असे प्रतिपादन आमदार -सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधुन केले.
गुरुवार दिनांक 1 मे 2025 रोजी मोर्शी मार्ग स्थित नवीन प्रशासकीय इमारत – अमरावती उप-विभागीय अधिकारी कार्यालय व अमरावती तहसील कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात त्या महाराष्ट्र राज्य वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी -आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते राष्ट्रध्वज तिरंगाला सलामी देण्यासह ध्वजारोहण करण्यात आले. तदनंतर जन गण मन अधिनायक जय हे या राष्ट्रगीताने सामूहिक राष्ट्रगानाने यावेळी उपस्थितांनी राष्ट्र व महाराष्ट्र राज्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.यादरम्यान ” जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा ” हे राज्यगीत सुरु असताना राजा बढे यांच्या कवितेच्या सुंदर ओळी महाराष्ट्रा बद्दल खूप काही सांगून जातात, असे चित्र यावेळी दिसून आले. तदनंतर पोलीस दलाच्या वतीने राष्ट्रध्वज तिरंगाला सलामी देण्यात आली.
यादरम्यान पोलीस दलाच्या तर्फे मुख्य अतिथी – आमदार सौ. सुलभाताई खोडके यांना गार्ड ऑफ ऑनर अर्थातच सलामी देण्यात आली. याप्रसंगी अमरावती उप -विभागीय अधिकारी – अनिल भटकर, नायब तहसीलदार -सुनील रासेकर, राजू दंडाळे, स्नेहल देशमुख, टीना चव्हाण, पुरवठा अधिकारी -चैताली यादव आदीसह अमरावती उप -विभागीय अधिकारी कार्यालय व अमरावती तहसील कार्यालय येथील कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.