अकोल्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा
अकोला : शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, थकीत कर्जमाफी, पीकविमा आणि विविध समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा प्रारंभ आज अकोल्यात भव्य ट्रॅक्टर मोर्चाने झाला.
हजारोंचा जनसागर आणि सरकारविरोधी घोषणाबाजी
क्रिकेट क्लब मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात हजारो शेतकरी आणि ट्रॅक्टर्स सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान ‘शेतकरी वाचवा’, ‘कर्जमाफी द्या’, ‘फडणवीस सरकार हाय हाय’ अशा घोषणांनी शहरातील रस्ते दणाणून गेले.
मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचताच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. कर्जमाफी, पीक विमा, वीजबिल माफी, शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत अशा अनेक मुद्द्यांचा यात समावेश होता.
आमदार नितीन देशमुख यांचा फडणवीसांवर हल्लाबोल
शिवसेना (ठाकरे) गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.
“निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मोठमोठ्या गप्पा मारल्या होत्या. जसे एखादा फिल्मी हिरो भाषणात घोषणा करतो, तशाच घोषणा त्यांनी केल्या. पण आजही शेतकऱ्यांचा सातबारा कोराच राहिलेला आहे,” असे म्हणत देशमुख यांनी सरकारच्या अपयशावर बोट ठेवले.
विधानभवनावर धडक देण्याचा इशारा
“या मागण्या त्वरित मान्य केल्या नाहीत, तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात लाखो शेतकऱ्यांसह विधानभवनावर मोर्चा काढू,” असा इशाराही त्यांनी दिला.