शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उद्धव ठाकरे शिवसेनेचा अमरावतीत भव्य ट्रॅक्टर मोर्चा!
अमरावती : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी आज अमरावती शहरात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. गाडगे नगर येथील गाडगे बाबा मंदिरापासून सुरुवात झालेल्या या मोर्चात भगवे ध्वज, विविध मागण्यांचे फलक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधणारे घोषवाक्य झळकत होते.
या मोर्चात शिवसेना नेते व खासदार अरविंद सावंत यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी मोर्चाचे नेतृत्व करताना राज्यसरकारवर जोरदार टीका केली. “शेतकरी कर्जात बुडाला आहे, तर जवान देशासाठी प्राण देतोय, पण पंतप्रधान मात्र परदेश दौऱ्यांवर आहेत,” अशा आशयाचे बॅनर्स मोर्चात विशेष लक्ष वेधून गेले.
मोर्चादरम्यान गगनभेदी घोषणा देत शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ट्रॅक्टरसह निघाले. “देवा भाऊ शेतकऱ्यांचा सातबारा कधी करता कोरा कोरा?” असे प्रश्न उपस्थित करणारे फलकही मोर्चात झळकले.
सिटी न्यूजचे प्रतिनिधी अजय श्रुंगारे यांनी यावेळी खासदार अरविंद सावंत यांच्याशी विशेष संवाद साधला. संवादात सावंत यांनी राज्यसरकारवर ताशेरे ओढले. मात्र, “उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत, यावर आपले मत काय?” असा प्रश्न विचारल्यावर सावंत यांनी या विषयावर बोलणे टाळले.
मोर्चात मोठ्या संख्येने महिला, युवक व ज्येष्ठ शिवसैनिक सहभागी झाले होते. आगामी काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिक आक्रमक भूमिका घेत आंदोलन उभारण्याचा इशारा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.