1 रुपयात पीकविमा बंद केल्याने उद्धव सेनेचा युवा गट आक्रमक, जिल्हा कृषी कार्यालयावर मोर्चा
अमरावती : राज्य सरकारने एक रुपयात शेतकऱ्यांना मिळणारी पीकविमा योजना बंद केल्याने उद्धव ठाकरे यांच्या युवा सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आज युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी कार्यालयावर धडक देत जोरदार आंदोलन केले.
यावेळी युवा सेनेने सरकारकडे पीकविमा योजनेतील पीक कापणी प्रयोगाची अट रद्द करण्याची मागणी केली. “ही अट शेतकऱ्यांना अन्यायकारक ठरत असून, त्यातून विम्याचे संरक्षण नाकारले जात आहे,” असा आरोप कार्यकर्त्यांनी केला.
आंदोलनादरम्यान युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय कोकाटे यांच्या फोटोला चपलांचा हार घालून तीव्र निषेध नोंदवला. कार्यकर्त्यांनी “शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर मौन, योजनांवर काटछाट” अशा घोषणा देत सरकारविरोधात संताप व्यक्त केला.
योजना बंद – प्रश्नचिन्ह अनेकावर
एक रुपयात पीक विमा मिळणारी योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार होती. मात्र, सद्य परिस्थितीत योजना बंद केल्यामुळे नुकसान भरपाईची हमी नाहीशी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आणि असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर युवा सेनेचे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
युवा सेनेचे पदाधिकारी म्हणाले की, “जर राज्य सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवली नाही, तर आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल.”