खेळाडूंनी खेळाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधावा
- जिल्हाधिकारी सौरभ कटियार
राज्यस्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, अमरावती विभाग, अमरावती तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद तसेच महाराष्ट्र ॲम्यिच्युअर नेटबॉल असोसिएशन यांच्या सहकार्याने विभागीय क्रीडा संकुल येथे सुरु असून 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत चालणार आहे.
या स्पर्धेचा उद्घाटन जिल्हा क्रीडा परिषद अध्यक्ष तथा, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक विजय संतान, सहसचिव श्याम देशमुख, महाराष्ट्र ॲम्यिच्युअर नेटबॉल असोसिएशन उदय ठाकरे, जिल्हा नेटबॉल असोशिएशन अध्यक्ष डॉ. सुगन बंड, अमरावती जिल्हा नेटबॉल असोसिएशन उपाध्यक्ष सुनिल कडू, अमरावती जिल्हा नेटबॉल असोसिएशन सचिव आदी यावेळी उपस्थित होते.
खेळाडूंनी अथक परिश्रम घेऊन राष्ट्रीय स्तरावर राज्याला नेटबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवून द्यावे. तसेच खेळाडूंनी खेळाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधावा. समाजात जनजागृती करण्यासाठी धर्म, वंश, जात, भाषेच्या पुढे जाऊन जनसामान्याला मतदानासाठी प्रोत्साहित व प्रेरित करावे. देशाच्या व राज्याच्या लोकशाहीचे परंपरेचे जतन करण्याचे कार्य युवा वर्ग व खेळाडूंनी करावे, असा संदेश जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दिला.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडूंनी क्रीडा ज्योत जिल्हाधिकारी श्री. कटियार व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन केले. याप्रसंगी खेळाडूंनी शपथ सोहळा सोबतच राष्ट्रीय मतदार जनजागृती करण्यासाठी मतदारांसाठीची प्रतिज्ञा सर्व खेळाडू, अतिथी, प्रशिक्षक, पालक, क्रीडा प्रेमी यांनी घेतली.
राज्यस्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार खेळाडूला 5 टक्के आरक्षणांतर्गत अमरावती शहरातील नेटबॉलचे राष्ट्रीय , खेळाडू ज्याची निवड पोलीस दलात झाली अशा अनुज तांमटे, सागर कुरळकर, सुमेरसिंग भिसेन यांचा यशोचित गौरव करण्यात आला. तसेच सत्र 2024-25 या वर्षातील नुकत्याच नांदेड येथे संपन्न झालेत्या राज्यस्तरीय शालेय धनुविद्या स्पर्धेत अमरावती येथील जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील धनुविद्या खेळाडूंनी जिल्ह्याचा लौकिक मिळवून दिला. तसेच नाडीचाड, गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय धनुविद्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघात रिकर्व्ह गटात 17 वर्ष वयोगट मध्ये कुमकुम मोहोड, 14 वर्ष वयोगटात सार्थक डांगे, वेदांत वानखडे तसेच इंडियन प्रकारात 14 वर्ष वयोगटातील अथर्व भोपटे, रोहन देवाडेकर, तनिष्क आखरे या खेळाडूंची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व शुभेच्छा जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या उद्घाटन सोहळ्यास राज्यातील 8 विभागातून आलेल्या 14 व 19 वर्ष वयोगटातील मुले व मुली खेळाडू संघ व्यवस्थापक, क्रीडा मार्गदर्शक व राज्य व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी, क्रीडा रसिक प्रेक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. संतान यांनी केले.