कुंडली, जात आणि नकार… वसईतील 20 वर्षीय तरुणीने घेतला टोकाचा निर्णय”
वसईत 20 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. मांत्रिकाच्या त्रासाला कंटाळून तरुणीला आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपी मुलाच्या कुटुंबीयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग आहे आणि तू खालच्या जातीची आहेस, असे सांगून लग्नाला नकार दिल्याने तरुणी नैराश्यात गेली होती. त्यातूनच तिने हे धक्कादायक पाऊल उचलले आहे. पीडित तरुणी ही वसईत राहत असून महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. तिचे आयुष राणा या तरुणासोबत मागील 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच वर्गात शिकत होते. या काळात लग्नाचे आमिष दाखवून आयुषने वारंवार तिच्याशी शरीरसंबंध ठेवले होते. मात्र नंतर तिला लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर तो तिला टाळू लागला.
तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग आहे. तसेच तू खालच्या जातीची असल्याने माझ्या मुलाचे लग्न तुझ्याशी लावून देऊ शकत नाही, असे आयुषच्या वडिलांनी तरुणीला सांगितले. त्यानंतर नैराश्यात गेलेल्या तरुणीने राहत्या घरी उंदीर मारायचे औषध प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी वसई पोलिसांनी मुलीचा प्रियकर आणि त्याच्या वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली आहे. मात्र या प्रकारामुळं तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.