नांदगावमध्ये पाण्यासाठी महिलांचा संताप; नगर पंचायत कार्यालयात घागरी फोडून आक्रोश

नांदगाव : नांदगाव नगर पंचायतमध्ये भयंकर पाणी टंचाई निर्माण झाली असून, यावर शिवसेनेच्या प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात महिलांनी नांदगाव नगर पंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो महिलांनी भाग घेतला आणि मुख्याधिकारी निवृत्ती भालकर यांना घेराव घालून घागर फोडून आपला संताप व्यक्त केला.
प्रकाश मारोटकर यांनी सांगितले की, “नांदगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चांदी प्रकल्पात मुबलक पाणी साठा आहे, तरीही नगर पंचायतच्या नियोजनाच्या अभावी १० ते १५ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.” यामुळे नांदगाव वासीयांना हंडाभर पाणी मिळवण्यासाठी उन्हात पायपीट करावी लागते आहे.
महिलांनी नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी केली असून, नगर पंचायत प्रशासनाने पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थेत सुधारणा केली नाही, तर शिवसेना पुढील आंदोलनाची योजना तयार करेल असेही स्पष्ट केले आहे.
नांदगावातील पाणी टंचाईला गंभीर स्वरूप धारण केले असून, नगरपालिकेच्या नियोजनाच्या कमतरतेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या आंदोलनामुळे पाणी पुरवठा प्रणालीतील धोके उघडकीस आले आहेत.