वाडेगावमध्ये वादळाचा कहर; निराधार महिलेचा संसार उघड्यावर

अकोला : अकोला जिल्ह्यातील वाडेगाव परिसरात मंगळवारी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे इंदिरानगर भागातील नागरी वस्तीला मोठा फटका बसला आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली असून काही घरांच्या भिंतीही कोसळल्या आहेत. या अनपेक्षित आपत्तीत अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेत विशेषतः एका निराधार महिलेच्या घरावरील संपूर्ण टिनपत्रे उडून गेल्यामुळे तिचा संसार उघड्यावर आला आहे. पावसाच्या पाण्यात सामान भिजून गेले असून राहण्यास सुरक्षित जागाही उरलेली नाही.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित महिलेला तात्पुरती मदत केली व मानसिक धीर दिला. मात्र या मदतीने पुरेसा दिलासा मिळाला नसून, शासनाने त्वरित पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबांना आपत्कालीन आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
स्थानिक प्रशासनाने या परिसराचा तात्काळ सर्व्हे करून गरजूंना मदत पोहोचवावी, अन्यथा जनतेचा रोष वाढू शकतो, अशी भावना नागरिकांमध्ये आहे.