उद्योगांसाठी लवचिक उद्योग धोरण राबविणार – उद्योग मंत्री उदय सामंत
अमरावती : अमरावती येथील टेक्सटाईल पार्कमध्ये उद्योगांना चांगल्या सेवा पुरविण्यात येत आहे. आता याठिकाणी पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहे. या पार्कमध्ये उद्योग यावेत, यासाठी जमिनीचे दर एक वर्षासाठी 600 रूपये ठरविण्यात आला आहे. उद्योगांसाठी लवचिक धोरण राबविणार असल्याची माहिती उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज श्री. सामंत यांनी उद्योजकांच्या समस्यांबाबत बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांच्यासह उद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. सामंत यांनी, पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कमध्ये 5 उद्योजकांनी 1300 कोटी रूपयांचे करार केले. मात्र जमिनीच्या दराबाबत प्रश्न असल्याने उद्योग सुरू होण्यास अडचण झाली. यावर उपाययोजना म्हणून आता एक वर्षासाठी 600 रूपये दर ठरविण्यात आला आहे. त्यामुळे याठिकाणी उद्योग सुरू होण्यास वेग येईल. त्यासोबतच सामाईक सोयीसुविधांचे दर 67 रूपयांवर आणण्यात आले आहे. यात अधिकच्या दराबाबतही 50 टक्के सवलत देऊन प्रलंबित रक्कम उद्योजकांकडून भरून घेतली जाणार आहे. या प्रकल्पामधून 10 ते 20 हजार रोजगार निर्मिती होणार आहे.
उद्योगांशी करार करण्यात आल्यानंतर 68 टक्के उद्योग सुरू करण्यात आले आहे. उद्योगांना सहकार्याची भूमिका शासनाने घेतली आहे. मात्र उद्योगांसाठी जमिन घेऊन उद्योग सुरू केला नसल्यास जमिनी परत घेतल्या जातील. येत्या काळात अमरावतीमध्ये आयटी पार्क, लघू व मध्यम उद्योजक पार्क यासोबतच आमझरी हे मधाचे गाव म्हणून साकारण्यात येणार आहे. उद्योजकांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी शासनाचा पुढाकार राहणार आहे.
गुरूकुंज मोझरी येथे राज्यातील चौथे पुस्तकाचे गाव निर्माण करण्यात येणार आहे. यात 35 कुटुंबांचा समावेश करण्यात येणार आहे. या कुटुंबांनी खानपानाचा परवाना काढल्यास पर्यटकांना चहा, नास्ता आणि जेवण, तसेच होमस्टेची सुविधा देऊ शकतील. याठिकाणी उत्कृष्ट आणि दुर्मिळ पुस्तके उपलब्ध राहणार आहे. त्यासोबतच येत्या सत्रापासून मराठी भाषा विद्यापिठात अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.