Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात सलग तीन दिवस अवकाळीचा कहर; शंभर घरांचे नुकसान, वीज पडून एकाचा मृत्यू

नंदुरबार : हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात अवकाळीने झोडपून काढले आहे. यासोबत जोरदार वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात सलग तीन दिवसापासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्याचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात घरांची देखील पडझड झाली आहे. तर बुलढाणा जिल्ह्यात देखील जोरदार वाऱ्यामुळे केळीचे पीक जमीनदोस्त झाले आहे.
राज्यात चार- पाच दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. यातच रोज कुठे ना कुठे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपीट देखील होत आहे. याचा फटका प्रामुख्याने शेतकऱ्यांना अधिक बसला असून पिकांचे नुकसान झाल्याने आर्थिक झळ शेतकऱ्यांना सहन करावी लागणार आहे. नंदुरबारसह धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आहे.
नंदुरबारमध्ये सलग तीन दिवस झालेल्या अवकाळीमुळे जवळपास १०० पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे. तर शेतात काम करणाऱ्या मजुरावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे आंबा, कांदा, भगर, उन्हाळी मूग, बाजरी यासह इतर पिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका वीट भट्टी चालकांना बसला असून जिल्ह्यातल्या विविध भागातील वीटभट्ट्यांवरून दहा लाख पेक्षा अधिक कच्च्या खराब झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.