अमरावतीमध्ये +92 पाकिस्तानी नंबरवरून बॉम्ब ब्लास्टची धमकी!

अमरावती : शहरातील औद्योगिक भागात खळबळजनक घटना समोर आली आहे. व्हेरिटो कंपनीत काम करणाऱ्या प्रशांत ठाकूर यांच्या मोबाईलवर शनिवारी सकाळी सुमारे १० वाजता +92 (पाकिस्तान) कोडवरून आलेल्या व्हॉट्सअप कॉलमध्ये भारतात चार ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कॉल मिळताच घाबरलेले ठाकूर यांनी तत्काळ नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राईम युनिटमार्फत कॉलचा स्त्रोत, IP अॅड्रेस आणि कॉल लॉग तपासणी सुरू करण्यात आली आहे.
यासोबतच गृह मंत्रालयाला घटनेची माहिती देण्यात आली असून, कंपनी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
धमकी फेक आहे की गंभीर, याचा तपास सायबर क्राइम युनिट करत असून, संपूर्ण कॉलचे रेकॉर्डिंग तांत्रिक तपासणीसाठी पाठवले गेले आहे. या घटनेनंतर संपूर्ण अमरावती जिल्हा हाय अलर्टवर ठेवण्यात आला आहे. सर्व पोलीस पदाधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून संपूर्ण यंत्रणा सतर्क आहे.
पोलिसांकडून नागरिकांना अनोळखी किंवा संशयास्पद नंबरवरून आलेले कॉल न उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.