जागेच्या वादातून महिला सरपंचसह पतीवर हल्ला | मारणीचा व्हिडिओ व्हायरल, नांदेडची घटना

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील फत्तेपूर शिवारात एका जुन्या जमीन वादामुळे गंभीर हिंसाचाराची घटना समोर आली आहे. इंजेगाव येथील विद्यमान महिला सरपंच आणि त्यांच्या पतीवर चार ते पाच जणांनी शिवारात काम करत असताना अचानक हल्ला केला.
या हल्ल्यामागे जमीन मोजणीवरून सुरू असलेला जुना वाद असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष बाब म्हणजे, हल्लेखोरांनी सरपंच महिलेसही बेदम मारहाण केली आणि या घटनेचा मोबाईलद्वारे व्हिडिओ रेकॉर्ड केला. सदर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, त्यामुळे स्थानिक पातळीवर संतापाची लाट उसळली आहे.
पीडित सरपंच दाम्पत्याने तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून, लोकप्रतिनिधीवर अशा प्रकारे हल्ला होणे धक्कादायक असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
दरम्यान, आरोपींच्या बाजूने असा दावा करण्यात आला आहे की, सरपंचपदाचा वापर करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत होता. सध्या पोलीस व्हायरल व्हिडिओच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.