Accident News : लग्नात भाचीला आशीर्वाद देऊन परतलेल्या मामावर काळाचा घाला; घरी परतताना दुचाकीला अपघात, मामी जखमी

धुळे : भाचीच्या लग्नात उपस्थिती लावत गोरज मुहूर्तावर असलेल्या विवाह समारंभात नवदाम्पत्याला शुभार्शिवाद देऊन बहीण व नववधू भाचीच्या निरोप घेऊन मामा व मामी घरी जाण्यासाठी निघाले. मात्र काही अंतरावर गेले असतानाच दुचाकीला अपघात झाला. यात मामाचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेली मामी गंभीर जखमी झाली आहे. जखमीला लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोंडाईचा- शिंदखेडा राज्य मार्गावर दलवाडे (प्र. नंदुरबार, ता. शिंदखेडा) फाट्याजवळ रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात उदयसिंह गुलाबसिंह गिरासे (वय ५६) यांचा मृत्यू झाला आहे. तर मामी उषाबाई गिरासे (वय ४७) या गंभीर जखमी आहेत. धुळ्यातील कुंभारे येथील भाची वैशाली दिलीपसिंह गिरासे हिचा १० मे रोजी गोरज मुहूर्तावर विवाह सोहळा होता. या विवाहाला वैशाली गिरासे हिचे मामा उदयसिंह व मामी उषाबाई उपस्थित होते.
दरम्यान विवाह सोहळा आटोपल्यानंतर बहीण व भाचीच्या निरोप घेऊन रात्रीच मामा उदयसिंह गिरासे व मामी उषाबाई गिरासे दुचाकीने वरसूस येथे घरी परत जाण्यासाठी निघाले. मात्र दोंडाईचा- शिंदखेडा रस्त्यावर दलवाडे (प्र. नंदुरबार) फाट्याजवळ रात्री पावणेआठच्या सुमारास उभी असलेली ट्रॅक्टर ट्रॉली दिसली नाही. यामुळे पाठी मागून दुचाकी जोरदार धडकली. या अपघातात उदयसिंह गिरासे यांचा जागीच मृत्यू झाला, तर उषाबाई यांचा हात व पाय फ्रॅक्चर झाला.
विवाह सोहळ्यात शोककळा
अपघातानंतर उदयसिंह यांना शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी उषाबाई गिरासे यांच्यावर धुळ्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेची माहिती विवाह सोहळ्याच्या ठिकाणी समजताच येथे शोककळा पसरली होती. या प्रकरणी मृत उदयसिंह यांचे चुलत भाऊ डॉ. ज्ञानसिंह सोलंकी यांच्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.