Whatsappवर स्टेट्स, बाथरूममध्ये जाऊन गळा चिरला; बीडच्या तरूणानं पुण्यात आयुष्य संपवलं

भोपाळ येथील एम्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या बीडच्या तरूणाने पुण्यात येऊन आत्महत्या केली आहे. त्याने स्वत:चा गळा चिरून आयुष्य संपवले असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना सोमवारी उघडकीस आली असून, वानवडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अस्पष्ट असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
उत्कर्ष महादेव हिंगणे (वय वर्ष १८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सध्या तो भोपाळ येथे वैद्यकीय पदवीसाठी शिक्षण घेत होता. तरूण हा बीड येथील रहिवासी असून, त्याने पुण्यातील फातिमा नगर, वानवडीतील पंचरत्न हाऊसिंग सोसायटी येथे राहत्या ठिकाणी बाथरूममध्ये गळा चिरून आत्महत्या केली.
व्हॉट्सअॅपवर सुसाईड नोट
ही धक्कादायक घटना सोमवारी सकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास घडली. तरूणाने आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअॅप स्टेटसवर आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट पोस्ट केली होती. त्यात त्याने आपल्या बिघडलेल्य मनस्थितीचे आणि आत्महत्येचे कारण दिले असून, प्राथमिक माहितीनुसार अभ्यासाचा तणाव हे कारण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
नियंत्रण कक्षाला फोनवर माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला असून, रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. तरूणाने आत्महत्या का केली? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.