बुद्ध पौर्णिमेनिमित्त अकोल्यातील शिर्ला बुद्धभूमीवर १२ तासांचा महाबोधी वृक्ष पूजन सोहळा!

अकोला : अकोल्याच्या पातुर तालुक्यातील ऐतिहासिक शिर्ला बुद्धभूमी येथे बुद्ध पौर्णिमा निमित्त १२ तासांचा महाबोधी वृक्ष महापूजन सोहळा भक्तिभावाने पार पडला. या पवित्र कार्यात त्रिसरण, पंचशील, बुद्धवंदना आणि पवित्रण पाठ सुमारे शेकडो उपासक-उपासिकांच्या सहभागातून साजरा झाला.
नागपूर येथील दीक्षाभूमी आणि मुंबईच्या चैत्यभूमी यांच्या मध्यस्थी असलेले पश्चिम विदर्भातील एकमेव पवित्र स्थळ म्हणून बुद्धभूमी शिर्ला ओळखली जाते. इथे दरवर्षी हजारो भाविक बुद्ध पौर्णिमेला दर्शनासाठी गर्दी करतात.
भदंत संघपाल महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरांचे आयोजन
मुंबई येथील चैत्यभूमीचे व्यवस्थापक पूज्य भदंत बी. संघपाल महाथेरो यांच्या मार्गदर्शनाने गेल्या अनेक वर्षांपासून या स्थळी श्रमणेरी शिबिर, महिला उपासिका शिबिर आणि विपश्यना शिबिरांचे यशस्वी आयोजन होत आहे.
गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या श्रामणेरी शिबिराचा समारोप आज बुद्ध पौर्णिमा दिवशी भव्य महापूजनाने करण्यात आला.
महाबोधी वृक्षपूजन, बौद्ध कलश वंदना आणि विद्युत रोषणाईने नटलेले शिर्ला!
आजच्या विशेष दिवशी भिक्षु संघाच्या उपस्थितीत महाबोधी वृक्षाचे पूजन करण्यात आले. तसेच ‘बौद्ध कलश वंदना’, त्रिसरण व पंचशील यांच्या पठणाने परिसर पवित्रतेने न्हाऊन निघाला.
शिर्ला बुद्धभूमी परिसर आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करून साजरा करण्यात आला असून, उपासक-उपासिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या धार्मिक कार्यक्रमाचा श्रद्धा, साधना आणि संयमाचा संगम असा अनुभव उपस्थितांनी घेतला.