“नांदेडच्या कौठा बस स्थानकात चिखलाचे साम्राज्य – प्रवाशांचा संताप, प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी”

नांदेड : नांदेडमधील अवकाळी पावसामुळे कौठा परिसरात असलेल्या स्थलांतरित बस स्थानकात अक्षरशः चिखलाचे साम्राज्य पसरले असून प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे. बस स्थानक म्हणून आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव आणि रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेला गोंधळ यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची भावना उसळली आहे.
रस्त्याच्या कामामुळे स्थलांतर, पण नियोजन शून्य!
नांदेड रेल्वे स्थानक ते मध्यवर्ती बस स्थानक या रस्त्याचे काम सुरू असल्याने सुमारे महिन्याभरापूर्वी हे स्थानक कौठा भागात स्थलांतरित करण्यात आले. मात्र, स्थलांतरित बस स्थानकावर कोणतीही योग्य पूर्वतयारी न केल्याने नागरिकांना तासन्तास उभं राहावं लागतंय. बस कोणत्या दिशेने जाणार, कुठे थांबणार हे स्पष्ट नसल्याने प्रवासी गोंधळले आहेत.
अवकाळी पावसाने उघडं केलं प्रशासनाचं अपयश
काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर चिखल साचला आहे. प्रवाशांचे पाय चिखलात रुतत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना विशेषतः त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरच बस लागल्याने वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला असून ट्राफिक जामची परिस्थिती उद्भवली आहे.
प्रवाशांचा संताप, प्रशासनाच्या दुर्लक्षावर सवाल
अनेक प्रवासी “ही काय सुविधा?” असा सवाल उपस्थित करत आहेत. “पावसाचे आधीच भाकीत होतं, तरीही काहीच उपाययोजना नाही. आम्ही प्रवासी की शिक्षा भोगणारे?” अशी प्रतिक्रिया स्थानिक नाग
रिकांनी दिली आहे.
तातडीने उपाययोजना कराव्यात – प्रवाशांची मागणी
स्थानिकांनी आणि प्रवाशांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की कौठा बस स्थानकात चिखल हटवण्यासाठी तत्काळ यंत्रणा सक्रिय करावी, आवश्यक सुविधा जसे की मार्गदर्शक फलक, रस्ता मुरुमयुक्त करणे, शौचालय आणि निवाऱ्याची सोय लवकरात लवकर करावी.