शहरातील घुमंतूकांना त्यांच्या मुळगांवी रवाना करण्याची कार्यवाही गतीने पूर्ण करा – आ. सुलभा खोडके

अमरावती :- अमरावती शहराला आकर्षण सौंदर्यीकरणाने एक चांगले स्वरूप व लौकिक प्राप्त होत असतांना दुसरीकडे घुमंतूकांनी मुख्य चौकांना व दर्शनी भागाला वेढा घातल्याने शहराचे सौंदर्य बाधित झाले आहे. शहरातील ऐतिहासिक धरोहर असलेल्या शाळा व इमारतीच्या ठिकाणी सुद्धा घुमंतूकांनी ठिय्या मांडला असल्याने वाहतुकीचा प्रश्न व अस्वच्छतेची समस्या सुद्धा निर्माण झाली आहे. याबाबत आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी ठोस पाऊले उचलून आज दिनांक १२ मे २०२५ रोजी शहरातील नूतन कन्या शाळा परिसरात धडक देऊन घुमंतूकांवर कार्यवाहीला घेऊन मनपा व पोलीस प्रशासनाला स्पष्ट सूचना केल्यात.
शहरातील न्यू हायस्कुल मेन शाळा व नूतन कन्या शाळेने यंदा आपले शताब्दी महोत्सवी वर्ष साजरे करीत असून संस्थेत विविध कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जात आहे. मात्र त्या भागात घुमंतूक घटकांचे वाढते अतिक्रमण हे त्रासदायक ठरत असतांना वाहतूक व स्वच्छतेला घेऊन सुद्धा अडचणींचे ठरत आहे. या संदर्भात पोलीस विभाग व मनपा प्रशासनाच्या वतीने गेल्या काळात कार्यवाह्या करण्यात आल्या. मात्र नंतर परिस्थिती जैसे -थे च असल्याने आज शहरात वाढते घुमंतूकांचे अतिक्रमण हे अनेक बाबतीत धोक्याचे ठरत आहे. यासंदर्भात जलद गतीने ठोस पाऊले उचलून थेट कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार महोदयांच्या वतीने मनपा व पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या. यावेळी आमदार महोदयांनी स्थानिक घुमंतूकांशी संवाद साधतांना त्यांना मूळ गावी परत जाण्यास सांगितले. या संदर्भात पोलीस विभाग व मनपा प्रशासनाने घुमंतूकांना त्यांच्या मूळगांवी रवाना करण्याबाबतची कार्यवाही यथाशीघ्र करण्याची सूचना केली. शहराच्या दर्शनी भागात ठिय्या मांडून वाहतुकीला अडचण निर्माण करण्याचा प्रकार पोलिसांनी खपवून घेऊ नये, तसेच शहर जर अस्वच्छता करण्याचा प्रकार घडत असेल तर संबंधित यंत्रणेने त्यांच्यावर थेट कारवाई करण्याची सूचना आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आली. शहरातील राजकमल चौक, इर्विन चौक, श्यामचौक ते तहसील मार्ग, आदी ठिकाणी असलेल्या घुमंतूकांच्या बेड्यावर सुद्धा कारवाई करून त्यांना त्यांच्या मूळ गांवी रवाना करण्यात यावे, व जर पुन्हा त्यांनी शहर विद्रुप करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर पाऊले उचलण्याची सूचना सुद्धा आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी मनपा प्रशासन व पोलीस विभागाला केली. शहरातील घंटाघर परिसर , नूतन कन्या शाळा व न्यू हास्यकुल मेन शाळा हे आपल्या शहराचे जुने वैभव आहे. त्याचे जतन व संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे. त्यामुळे कुणाकडूनही त्याला बाधा अथवा विद्रुपता पोहोचविण्याचा किंवा सौंदर्य लुप्त करण्याचा प्रयत्न होत असल्यास तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार महोदयांनी दिल्या. यावेळी मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजापेठ भंवर , सिटी कोतवालीचे पोलीस निरीक्षक कोटनाके, मनपा जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर,अतिक्रमण विभाग प्रमुख कोल्हे, स्वच्छता निरीक्षक कलोते, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश मोहरील आदींसह मनपा व पोलीस विभागातील कर्मचारी व शाळेचे शिक्षकवृंद उपस्थित होते.