पिंपळखुट्यात गॅरेजमध्ये तोडफोड अकोल्यात गुंडाराजचा कहर

अकोला : पिंपळखुटा गावातील साहील ऑटो सर्व्हिसेस या गॅरेजमध्ये अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्री घुसून तोडफोड आणि आगजनी केली. या घटनेत चार दुचाकी जळून खाक झाल्या असून, गॅरेजमालक शाहरूख खान वजीर खान यांचे एकूण ₹१.४१ लाखांचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण पसरले असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त होत आहे.
१० मे रोजी सकाळी ८ वाजता शाहरूख खान एका विवाहसमारंभासाठी बाहेरगावी गेले होते. ११ मे रोजी रात्री ११:५० वाजता गॅरेजजवळ आल्यावर त्यांना गावातील सदा तायडे, ज्ञानेश्वर तराळे, विकी दांदळे, संतोष महानकार आणि योगेश ठक हे पाच युवक संशयास्पदरीत्या उभे असलेले दिसले. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
१२ मे रोजी सकाळी ८:३० वाजता ग्रामस्थ भाऊराव वानखडे यांनी फोनवरून माहिती दिली की दोन दुचाकी पुलाखाली खड्ड्यात आढळल्या आहेत. घटनास्थळी पोहोचल्यानंतर शाहरूख यांनी ओळखले की त्या त्यांच्याच गॅरेजजवळ दुरुस्तीसाठी उभ्या केलेल्या गाड्या होत्या – बजाज पल्सर (₹३०,०००) व होंडा CD-100 (₹१४,०००).
गॅरेज उघडल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की मागील टिनशेड वाकवून आत प्रवेश करून दोन इतर दुचाकींना आग लावण्यात आली आहे – एचएफ डिलक्स व दुसरी पल्सर. याशिवाय होंडा कंपनीची पानबुडी मोटर व सुमारे ₹४०,००० किमतीचे ऑटो पार्ट्सही जळून खाक झाले.
एकूण नुकसान
४ दुचाकींचे नुकसान: ₹१,०१,०००
ऑटो पार्ट्स व उपकरणे: ₹४०,०००
एकूण नुकसान: ₹१,४१,०००
पोलीस तक्रारीवर दुर्लक्षाचा आरोप
शाहरूख खान यांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र त्यांच्या मते, तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांनी उशीर केला. अखेर उशिरा का होईना, भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४(५), ३२६(एफ) बीएनएस अंतर्गत अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गुन्हेगारी वाढ व पोलिसांवर संरक्षणाचा आरोप
गावात सातत्याने वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी आरोप केला की, काही गुन्हेगारी वृत्तीचे तरुण पोलिसांच्या पाठबळावर गुंडगिरी करत आहेत. “पोलीस कारवाई करत नाहीत, त्यामुळे गुंडाराज वाढतोय”, असा आरोप अनेक ग्रामस्थांनी केला आहे.
एका ग्रामस्थाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले – “आम्ही अनेकदा तक्रारी दिल्या पण पोलिसांकडून दुर्लक्ष झाले. आता आमच्याच गावात असुरक्षित वाटते.”
पोलीस अधिकारी उत्तर देण्यास टाळाटाळ
घटनेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी दैनिक सुफ्फाने संबंधित पोलिस अधिकाऱ्याशी २ ते ३ वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कॉल रिसीव न करता संवाद टाळला, यावरून “ते जबाब का देत नाहीत?” असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांची मागणी: कठोर कारवाई करा!
गावातील शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी ग्रामस्थांनी आरोपींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. दोषींना तत्काळ अटक करून कारागृहात टाकण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.