काँग्रेस नेते हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा बेपत्ता

अमरावती : अमरावती शहरात खळबळजनक घटना घडली असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नगरसेवक हरिभाऊ मोहोड यांचा ३० वर्षीय मुलगा वैभव हरिभाऊ मोहोड १३ मे रोजी सकाळी अचानक बेपत्ता झाला आहे. विशेष म्हणजे, १४ मे रोजी त्याचा विवाह सोहळा पार पडणार होता, मात्र त्याआधीच तो गायब झाल्याने संपूर्ण मोहोड कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे.
घटनेची सविस्तर माहिती:
वैभव मोहोड हे काँग्रेस नगर परिसरातील रहिवासी असून सकाळी कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेले.
त्यांच्या वडिलांनी – हरिभाऊ मोहोड यांनी तात्काळ फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात धाव घेत वैभवच्या बेपत्ताबाबत तक्रार दाखल केली.
सूत्रांच्या माहितीनुसार, वैभवने घरून निघताना जवळ २००० रुपये घेतले होते. त्यानंतर त्यांनी राजकमल चौकातील ATM मधून ४० हजार रुपये काढले व शहरातून बाहेर गेले, असा अंदाज आहे.
पोलीस निरीक्षक निलेश करे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे १३ मे च्या दिवशीच विविध पोलीस पथके वैभवच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.
पोलीसांकडून माहिती:
फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक निलेश करे यांनी सांगितले की,
“वैभवच्या शोधासाठी पोलीस प्रयत्नशील असून तांत्रिक तपासावर आधारित शोध मोहीम सुरू आहे. लवकरच वैभवचा ठावठिकाणा लागेल असा आमचा विश्वास आहे.”
कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण:
लग्नाच्या आदल्या दिवशी अशी घटना घडल्याने मोहोड कुटुंबिय मानसिक तणावात असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
कोणी वैभव बाबत माहिती दिल्यास:
फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा.