अकोल्यात सराफा दुकानांवर आयकर विभागाची सलग दुसऱ्या दिवशी कारवाई
अकोला : शहरातील गांधी रोड परिसरात आयकर विभागाने सराफा व्यवसायिकांवर घातलेल्या छापेमारीची खळबळ अजूनही कायम असून ही कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. आयकर विभागाने बुधवारी सकाळपासून काही नामांकित सराफा दुकानांवर छापे टाकून आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी सुरू केली आहे.
गुरुवारीदेखील सकाळपासून या दुकानांपुढे आयकर विभागाची शासकीय वाहने उभी राहिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही कारवाई नागपूर आयकर विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, यामध्ये दुकानदारांच्या खरेदी-विक्री व्यवहारांचे रेकॉर्ड, बिले व आर्थिक दस्तऐवजांची तपासणी केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
विशेष म्हणजे, तपासणी दरम्यान काही महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र, अद्याप आयकर विभागाकडून अधिकृत प्रेस नोट जारी करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही कारवाई नेमकी किती दिवस चालणार? कोण-कोणत्या दुकानांवर लक्ष केंद्रित आहे? याबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
या कारवाईमुळे परिसरातील इतर सराफा व्यावसायिकांमध्येही मोठी चिंता पसरली असून, अनेकजण आपल्या आर्थिक व्यवहारांबाबत अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.