अमरावतीच्या विद्यार्थ्याची नांदेडमध्ये गोदावरीत उडी घेऊन आत्महत्या
नांदेड : नांदेड शहरातील लोटस नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या अमरावतीच्या २२ वर्षीय पुनीत वाटकर याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. गोदावरी नदी पात्रात त्याचा मृतदेह सापडल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मूळचे अमरावतीचे रहिवासी असलेले पुनीत आणि त्यांची बहीण श्वेता वाटकर हे नांदेडमध्ये शिक्षणासाठी वास्तव्यास होते. आत्महत्येमागे कॉलेज प्रशासन व शिक्षकांकडून होणारा मानसिक त्रास कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप श्वेता वाटकर हिने केला आहे.
या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या रोषाला कारण ठरलेल्या या घटनेवर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे.
पुनीतला न्याय मिळावा, दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी, या मागणीसाठी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. विद्यार्थ्यांनी आक्रमक होत “पुनीतला न्याय मिळाला पाहिजे” अशा घोषणा दिल्या.
“आम्हाला वारंवार मानसिक त्रास दिला जात होता. पुनीतने ते सहन केलं आणि शेवटी आयुष्य संपवलं. दोषींवर गुन्हा दाखल व्हावा, हीच माझी मागणी आहे,” अशी भावना श्वेता वाटकर हिने ‘सिटी न्यूज’शी बोलताना व्यक्त केली.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता राज्यभरातून होऊ लागली आहे.