वणी येथील निरगुडा नदी पात्रात घरकूल लाभार्थ्यांसाठी वाळू सत्याग्रह आंदोलन

वणी : यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये पावणे दोन लाख घरकुल विविध योजनांतून मंजूर करण्यात आले असून, यामध्ये वणी तालुक्याला १०,००० घरकुलांचे मंजुरी मिळाली आहे. मात्र, मोफत वाळू पुरवठ्याच्या धोरणाची अंमलबजावणी न झाल्याने अनेक लाभार्थ्यांचे घरबांधकाम रखडले आहे.
वाळू मोफत मिळण्याचे धोरण केवळ कागदावरच
राज्य शासनाने घरकुल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रास वाळू मोफत देण्याचे धोरण राबवले असले तरी, प्रत्यक्षात लाभार्थ्यांना रेती चढ्या दराने विकत घ्यावी लागत आहे. या प्रकारामुळे गोरगरिबांचे घरकुल बांधकाम थांबले असून, पावसाळ्यात अडचणींचा डोंगर उभा राहण्याची शक्यता आहे.
निरगुडा नदी पात्रात ‘वाळू सत्याग्रह आंदोलन’
या अन्यायाविरोधात वणी तालुक्यातील निरगुडा नदी पात्रात वाळू सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. घरकुल लाभार्थ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. “मोफत वाळू देण्याचे आश्वासन केवळ जाहिरातीपुरते ठरले का?” असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
लाभार्थ्यांची मागणी स्पष्ट – “घर हवं तर वाळू द्या!”
घरकुल योजनेतील लाभार्थ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, वाळू मोफत मिळवून देण्यासाठी तत्काळ यंत्रणा कार्यान्वित करावी. जे ठेकेदार व अधिकाऱ्यांमुळे मोफत वाळू मिळत नाही, त्यांच्यावर कारवाई करावी. पावसाळ्याआधी वाळूचा पुरवठा पूर्ण करावा, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.