अकोल्यात १६ किलो गांजासह तिघे अटकेत, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
अकोला : अकोल्याच्या रामदासपेठ परिसरातून १६ किलो गांजाची तस्करी करणाऱ्या तिघा संशयितांना अटक करण्यात आली असून, सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही धडक कारवाई अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
मिळालेली गुप्त माहिती आणि तत्काळ कारवाई
अकोला स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून काही इसम गांजाची विक्री करण्यासाठी रेल्वे स्टेशनमार्गे मनपा सेमी-इंग्रजी शाळा क्र. ७ समोरील पाण्याच्या टाकीजवळ येणार असल्याचे निदर्शनास आले. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी नाकाबंदी केली आणि सापळा रचला.
अटक केलेले आरोपी:
बादल लाला कांबळे
सुनील द्वारका प्रसाद यादव
रोशन भास्कर सोनोने
यांच्या ताब्यातील बॅगांची झडती घेतली असता, एकूण १६ किलो गांजा आढळून आला, ज्याची अंदाजे किंमत ₹३,२०,००० आहे. याशिवाय तीन मोबाइल फोनही पोलिसांनी जप्त केले असून, सर्व मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ₹३.५ लाख आहे.
कायदेशीर कारवाई सुरू
या तिघांविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अकोला पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा मोठा साखळी दुवा उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रतिनिधी : मुकेश धोके