अकोला जिल्ह्यात बालविवाह टळला! प्रशासनाची तत्पर कारवाई; १६ वर्षीय बालिकेचा विवाह थांबवण्यात यश
अकोला : अकोला जिल्ह्यात बालविवाहमुक्त जिल्हा निर्माण करण्यासाठी कार्यरत असलेल्या ॲक्सेस टु जस्टीस प्रकल्प आय.एस.डब्ल्यू.एस. अकोला आणि बाल कल्याण समितीच्या अथक प्रयत्नांमुळे बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात होणारा अल्पवयीन मुलीचा विवाह यशस्वीपणे रोखण्यात आला. या कारवाईत स्थानिक ग्राम बाल संरक्षण समिती, ग्राम पंचायत अधिकारी, आणि जिल्हा महिला व बाल विकास विभागानेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
गोपनीय माहितीवर तातडीने कारवाई
दिनांक 15 मे 2025 रोजी ॲक्सेस टु जस्टीस प्रकल्पाला गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की, बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह 16 मे 2025 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील 25 वर्षीय व्यक्तीसोबत तिच्या राहत्या घरी होणार आहे. या माहितीच्या आधारे तातडीने कारवाईला सुरुवात झाली. सकाळी ग्राम बाल संरक्षण समिती आणि ग्राम पंचायत अधिकाऱ्यांनी मुलीच्या घरी भेट देऊन तिच्या पालकांना बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 ची माहिती दिली आणि मुलीचे लग्न अल्पवयात न करण्याबाबत हमीपत्र लिहून घेतले. पालकांनी मुलीचे लग्न 18 वर्षांपूर्वी न करण्याचे आश्वासन दिले.
मात्र, या प्रकरणात शंका असल्याने त्याच दिवशी दुपारी 4 वाजता बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अनिता गुरव, ॲक्सेस टु जस्टीस प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे आणि कम्युनिटी सोशल वर्कर राजश्री कीर्तीवर यांनी मुलीच्या घरी पुनर्पाहणी केली. यावेळी त्यांना धक्कादायक वास्तव समोर आले. मुलीच्या घरी लग्नाची तयारी जोरात सुरू होती. पाहुणे मंडळी जमली होती, हळदीचा कार्यक्रम सुरू होता, आणि पारंपरिक पद्धतीने महिलांना बांगड्या भरण्याचा कार्यक्रमही चालू होता. मुलीला भेटवस्तू म्हणून देण्यासाठी आणलेले आंदणही तिथे उपस्थित होते.
या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने मुलीचे पालक, वऱ्हाडी पाहुणे आणि नातेवाइकांची बैठक घेण्यात आली. बाल कल्याण समिती आणि ॲक्सेस टु जस्टीस प्रकल्पाच्या टीमने सर्वांना बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अंतर्गत माहिती दिल – अल्पवयीन मुलीच्या लग्नामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न करता येणार नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले. सर्वांचे समुपदेशन करण्यात आले आणि मुलीला तसेच तिच्या पालकांना बाल कल्याण समिती, अकोला येथे उपस्थित राहण्याची नोटीस बजावण्यात आली.
हमीपत्र आणि कारवाई बाल कल्याण समितीसमोर मुली, तिचे पालक, मुलाचे पालक आणि वऱ्हाडी मंडळींना हजर करण्यात आले. समितीने मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न न करण्याचे हमीपत्र मुलीच्या आणि मुलाच्या पालकांकडून लिहून घेतले. यावेळी ग्राम सचिव आणि सरपंच यांची साक्ष घेण्यात आली.
या कारवाईत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश पुसदकर आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अनिता गुरव, सदस्य राजेश देशमुख, प्रांजली जयस्वाल, शिला तोषणीवाल, विनय दांदळे, तसेच ॲक्सेस टु जस्टीस प्रकल्प आय.एस.डब्ल्यू.एस. चे जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे, सपना गजभिये, विशाल गजभiye, पूजा पवार, राजश्री कीर्तीवर, पूजा मनवर, ग्राम अधिकारी, सरपंच आणि ग्राम बाल संरक्षण समिती यांनी या बालविवाहाला थांबवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ॲक्सेस टु जस्टीस प्रकल्प आणि बाल कल्याण समितीने या कारवाईद्वारे समाजात बालविवाहाविरोधात जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अकोला जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी अशा कारवाया भविष्यातही सुरू राहतील, असे शंकर वाघमारे यांनी सांगितले.