नांदेडमध्ये भररस्त्यात तरुणावर हल्ला – सीसीटीव्हीत संपूर्ण घटना कैद

नांदेड : नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री उशिरा घडलेल्या मारहाणीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. निलेश कल्याणकर नावाच्या तरुणावर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी रॉडने बेदम मारहाण केली असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निलेश कल्याणकर हा आपल्या मित्रासह पायी जात असताना, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. आरोपींनी रस्त्यावरच निलेशवर रॉडने मारहाण केली. या घटनेत निलेशला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेच्या वेळी परिसरात मोठी गर्दी जमली होती, मात्र कोणीही या वादात हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे प्रेक्षक बनलेल्या नागरिकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.