अकोल्यात अवकाळी पावसाचा फटका! कांदा-आलू-लसूण विक्रेत्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान

अकोला : अकोल्यात आज दुपारी झालेल्या अचानक अवकाळी पावसामुळे शहरातील जठार पेठ परिसरात कांदा, आलू आणि लसूण विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला.
ग्रामीण भागातून आलेले शेतकरी निलेश भिलारे हे आपल्या शेतीतील माल विक्रीसाठी शहरात आले होते. मात्र, अचानक कोसळलेल्या पावसामुळे त्यांच्या मालावर पाणी साचले आणि तो पूर्णपणे भिजला.
कांदा-आलू-लसूण रस्त्यावरच ओले; शेतमालाचे मोठे नुकसान
शेतकरी भिलारे यांनी रस्त्यावर आपला माल विक्रीसाठी मांडला होता. परंतु पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्याने संपूर्ण माल भिजून खराब झाला. शेतमाल आधीच बाजारात कमी दराने विकला जात असताना, अशा हवामानाच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडत आहे.
“सरकारने मदत करावी”, शेतकऱ्यांची मागणी
निलेश भिलारे यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांनी आता सरकारकडे नुकसान भरपाई आणि बाजारात योग्य दर मिळावा यासाठी मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “शेतीमाल विकण्यासाठी शहरात येतो, पण पावसामुळे माल खराब होतो आणि कोणतीही शासकीय मदत मिळत नाही.”