राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा अलर्ट, रत्नागिरीत पावसाच्या जोरदार सरी, मुंबईतही रिपरिप

Maharashtra Rain Updates : राज्यात आजपासून मुसळधार पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पाऊस पडेल असे हवामान विभागाचा अंदाज आहे. तर मंगळवारपासून मराठवाडा भागात पाऊस सुरु, होईल असा ही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईत रविवारी रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. सोमवारी पहाटेपासूनही मुंबई पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत. तसेच आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे. त्यामुळे आज मुंबईत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
तर रत्नागिरी जिल्ह्यात आणि आसपासच्या परिसरात सोमवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मात्र, हवेत गारवा निर्माण झाला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातला अनेक भागात अवकाळी पाऊस पडत आहे. रविवारी संध्याकाळी सह्याद्रीच्या दऱ्याखोरांमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये विजेचा लपंडाव सुरु आहे. मान्सून अंदमानत दाखल झाल्यानंतर आता कोकणात देखील त्याच्या आगमनाची चाहूल लागली आहे. येत्या काही दिवसांत मान्सून आधी केरळ आणि त्यानंतर कोकणात दाखल होईल.