सिकलसेल व थॅलेसेमिया रुग्णांसाठी अत्याधुनिक उपचार सुविधांची निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला सिकलसेल व थॅलेसेमिया मुक्त करण्यासाठी पावले उचलली आहेत. या दुर्धर आजाराच्या विळख्यातून रुग्णांना मुक्त करण्यासाठी येथील शासकीय महाविद्यालयात दर्जेदार उपचार सुविधांच्या निर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी हमी देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आज जवळपास 70 कोटी खर्चून निर्माण करण्यात आलेल्या विविध सुविधा व विकास कामांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार शामकुमार बर्वे, आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, संदीप जोशी, कृपाल तुमाने, अभिजीत वंजारी, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, संचालक डॉ.अजय चंदनवाले, सहसंचालक विवेक पाकमोडे, मुख्य अभियंता दिनेश नंदनवार आदी उपस्थित होते.
श्री फडणवीस म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ह्या मध्य भारतातील मोठ्या स्वरूपाच्या वैद्यकीय संस्था आहेत. सर्व स्तरातील रुग्ण येथे उपचारासाठी येतात. मात्र आधुनिक काळाशी अनुरूप अशा अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्याची गरज भासू लागल्याने येथे आधुनिक संसाधनांची उभारणी करण्यावर भर देण्यात येत आहे. विविध पायाभूत सुविधांमुळे या संस्थांच्या गुणात्मकतेत वाढ होणार आहे. या दोन्ही संस्थांमध्ये दर्जेदार सुविधांच्या निर्मितीसाठी व अद्ययावत उपचारासाठी जवळपास हजार कोटी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या प्रयत्नातून ह्या संस्था आधुनिक भारतातील ‘स्टेट ऑफ आर्ट’ वैद्यकीय संस्था म्हणून नावारूपाला याव्यात, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
रुग्णालयांना समाजातील आशेचे केंद्र म्हणून बघितल्या जाते. वैद्यकीय उपचार व शिक्षण क्षेत्रात या दोन्ही संस्था अग्रेसर राहाव्यात तसेच खाजगी संस्थांच्या तुलनेत येथील शिक्षण, सुविधा व उपचार अधिक दर्जेदार असावे असे सांगून श्री फडणवीस यांनी बाह्यरुग्ण तपासणी कक्ष, शस्त्रक्रिया विभाग, वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीसुविधांच्या निर्मितीवर प्राधान्याने भर द्यावा अशी सूचना केली. यातूनच नजीकच्या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कायापालट झालेला आपल्या दृष्टीस पडेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयात प्रारंभ होत असलेल्या विविध सुविधांची माहिती दिली.