मुंबईत कोरोनाचा शिरकाव? KEM रुग्णालयात दोन संशयित मृत्यूंनं आरोग्य यंत्रणा सतर्क!

Corona Virus News : आशियाई देशांमध्ये कोरोनाचा फैलाव होत असल्याच्या वृत्तानं पुन्हा एकदा खळबळ माजली असून, आता आरोग्य यंत्रणांनीसुद्धा खबरदारी बाळगण्यास सुरुवात केली आहे. उपलब्ध माहितीनुसार कोरोनाचा संसर्ग आता मुंबईतसुद्धा भीतीत भर घालताना दिसत आहे.
मुंबईच्या केईएम रुग्णालयात दोन संशयित कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळं शहरात कोरोनाचा शिरकाव झाला का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. दोन्ही रुग्णांच्या मृत्यूपूर्वी केलेल्या चाचणीमध्ये हे रुग्ण कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झाल्यानं भीती आणखी वाढत आहे. मात्र संशयित कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू त्यांना असलेल्या सहव्याधीमुळं झाल्याचं स्पष्टीकरण केईएम रुग्णालयानं दिलं आहे.
मृतांमध्ये 58 वर्षीय महिलेचा कर्करोगामुळे आणि 13 वर्षीय मुलीचा मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला असल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या दोन रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळं झाल्याचं म्हटल्यानं केईएम रुग्णालयातील या दोन रुग्णांचे रुग्णांचे मृत्यू नेमके कशामुळं झाले याबाबत संभ्रम निर्माण झाला असून, भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
आशियाई देशांमध्ये कोरोनाची दहशत..
आशियाई देशांमध्ये एकाएकी कोरोनाची दहशत वाढली असून, हाँगकाँग, सिंगापूरमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळं रुग्णसंख्येत भर पडताना दिसत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार सिंगापूरमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत 28 टक्क्यांची वाढ झाली.