Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करत येतात. अशीच एक कौतुकास्पद गोष्ट आता समोर आली आहे. नागपुरच्या लेकीने परदेशात कमाल केली आहे. नेत्रदीपक कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नागपूरच्या शहाना फातिमाची सायबरसुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी निवड करण्यात आली आहे.
अमेरिकेतील शिकागो इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इलिनॉय टेक) विद्यापीठाने प्रत्येक महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सात उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड केली आहे. यामध्ये शहाना फातिमाचाही समावेश आहे. शिकागो येथील इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून सायबर फॉरेन्सिक्स आणि सिक्युरिटी विषयात शहानाने मास्टर डिग्री मिळवली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यापासून मिळाली प्रेरणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून शहाना फातिमाला सायबरसुरक्षा क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळाली. तिने त्यावेळीचा एक किस्साही सांगितला आहे. काही वर्षांपूर्वी नागपूर येथील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “एक काळ असा होता जेव्हा ज्या राष्ट्रांकडे इंधनाचे साठे होते ते समृद्ध होते, पण आता ज्यांच्याकडे डेटाचे साठे असतील ते समृद्ध होतील.” मुख्यमंत्र्यांचं हे वाक्य ऐकून शहानाला प्रेरणा मिळाली.
शहानाचं भरभरून कौतुक
युरोपमधील कोसोवो येथे २०२४ मध्ये शहानाला एक महिना घालवण्याची संधी मिळाली होती. आपल्या चार सहकाऱ्यांसह तिने कोसोवोची राजधानी प्रिस्टिना येथील थ्री फोल्डर्स या मार्केटिंग कंपनीसाठी सायबरसुरक्षा पायाभूत सुविधा डिझाइन करून ती कार्यान्वित केली होती. शहाना फातिमाच्या घवघवीत यशानंतर सर्वच जण तिचं भरभरून कौतुक करत आहेत. तिच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे