आमदार संजय खोडके, सुलभा खोडके यांची कौशल्य विकास कार्यालयाला भेट

अमरावती : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राला आमदार संजय खोडके आणि सुलभा खोडके यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विभागास्तरावर रोजगार मेळावा आयोजित करण्याचे निर्देश दिले.
यावेळी जिल्हा कौशल्य विकास कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. यात प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, किमान कौशल्य विकास कार्यक्रम, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा योजनावर चर्चा झाली.
सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाते. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये उमेदवारांना रोजगार मिळण्याचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले. तसेच स्किल इंडिया पोर्टलवरील प्रक्रिया सुलभ झाल्यास अधिक प्रशिक्षण देणारे सहभागी होतील आणि उमेदवारांना प्रशिक्षण देणे शक्य होईल असे सांगितले.
आमदार संजय खोडके, सुलभा खोडके यांनी प्लेसमेंट ड्राईव्हचे कौतुक केले. उमेदवारांना रोजगार प्राप्त व्हावा, यासाठी जिल्हा उद्योग केंद्र आणि इंडस्ट्री असोसिएशन यांच्यासोबत बैठक घेऊन मनुष्यबळाची मागणी विचारात घेऊन लवकरच विभागस्तरावर महारोजगार मेळावा आयोजित करण्याचे निर्देश दिले.
सुरवातीला श्रीमती बारस्कर यांनी कार्यालयातील आधुनिकीकरण, तसेच परिसराची माहिती दिली. कौशल्य विकास अधिकारी श्रीमती वैशाली पवार यांनी प्रास्ताविक केले. यासाठी अभिषेक ठाकरे आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.