Pune Accident : उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे आला अन् दुर्दैवी घडले; भरधाव कारने मुलाला उडवले

पुणे : शाळेला सुटी असल्याने मामाच्या गावाला जाऊन सुटी घालविण्यासाठी आलेल्या चिमुकल्यावर काळाने झडप घातली. घराच्या अंगणात खेळत असताना रस्त्याने भरधाव वेगाने आलेल्या कारने त्याला उडविले. यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तेरा वर्षीय मुलाच्या मृत्यूने कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
पुण्याच्या कोंढव्यात सदरची घटना घडली आहे. निवृत्ती बाजीराव किसवे (वय १३, रा. हनुमंतवाडी, ता. चाकूर, जि. लातुर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. निवृत्ती याचे मामा कोंढवे येथे राहत असल्याने शाळेला सुट्या लागल्यानंतर तो मामाकडे आला होता. सुट्या संपल्यानंतर तो परत आपल्या गावी जाणार होता. या पूर्वीच दुर्दैवी घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे.
उपचारादरम्यान झाला मृत्यू
कोंढव्यात अपघात झाल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोंढवा गावठाण परिसरात असलेल्या वस्तीत अरुंद गल्ली तसेच नेहमी गजबज असते. अशा रस्त्यावरून खेडशिवापूर याठिकाणी भरधाव वेगाने ही गाडी जात होती. या गाडीने निवृत्ती यास उडविले. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कार चालक ताब्यात, तिघे फरार
कोंढवा गावठाणातील अरुंद व गजबलेल्या ठिकाणी गाडी भरधाव कार मध्ये चोघेजण होते. अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी कार चालकाचा चांगलाच चोप दिला. तसेच गाडीचे देखील नुकसान केले आहे. तर तीनजण पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तर कार चालक जैद नसीर शेख (वय २३) याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या विरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा नोंद करत त्याला अटक केली आहे. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमांतून पुढील तपास सुरु आहे.