नागपूरमध्ये ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक १ ने मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई शहराच्या मध्यवर्ती भागातील हनुमान गल्ली, हॉटेल श्री कन्हैया, सिताबर्डी येथे करण्यात आली.
अटक करण्यात आलेले आरोपीमध्ये वसिम खान उर्फ इमदात खान, वय ३७ वर्ष, रा. कमला रमण माता नगर, फक्रुद्दीन उर्फ खिल्ली मनुद्दीन कुरेशी, वय २६ वर्ष, रा. बैगनवाडी झोपडपट्टी, गोवंडी ईस्ट, मुंबई, अब्दुल वसीम अब्दुल नवाब शेख, वय ३४ वर्ष, रा. हंसापुरी, तहसील पोलीस ठाणे हद्द, नागपूर. हे तिघे मिळून मुंबईहून नागपूरमध्ये मेफेड्रोन (एम.डी.) नावाचा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणत होते. गुन्हे शाखेला मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलिसांनी हॉटेल श्री कन्हैया येथे सापळा रचून छापा टाकला.
त्या वेळी आरोपींकडून 618 ग्रॅम एम.डी. (मेफेड्रोन) पावडर किंमत अंदाजे 31,05,000 रुपये, चार मोबाईल फोन 40,000 रुपये, एक दुचाकी वाहन 1,00,000 रुपये, नगदी रक्कम 2,000 रुपये, इलेक्ट्रॉनिक काटा मशीन 1,000रुपये असा एकूण जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे 32,48,000 इतकी आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या अंमली कुठून आला आणि नागपूरमध्ये ते कोणाला विक्रीसाठी आणला होता याचा शोध पोलिस घेत आहेत.